मा. प्राचार्य मनोगत

महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक प्र‍बोधनाच्या वाटचालीत रयत शिक्षण संस्थेचे योगदान ऐतिहासिक पातळीवर निश्चितच नोंद घेण्यासारखे ठरते आणि त्याचीच एक शाखा म्हणून "जिजामाता कॉलेजचे" योगदानदेखील मत्वपूर्ण ठरते.

जिजामाता ज्यूनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा हे १२ जून १९४२ रोजी कर्मवीर अण्णांनी तत्कालीन कलेक्‍टर हमीदअली यांच्या पत्नी शरीफा बेगम अली यांच्या आग्रहास्तव काढलेले महाराष्ट्रातील पहिले मुलींचे कॉलेज होय. सुरूवातीला हे कॉलेज बखले वाडयात भरत होते. कर्मवीरांचा एकूलता एक मुलगा श्री.आप्पासाहेब पाटील यांच्या लग्नात शाहू महाराजांनी दिलेल्या सोन्याचांदीच्या ताट भरून मोहरांचा आहेर या कॉलेजच्या उभारणीसाठी अण्णांनी दिला. त्यांच्या त्यागावरतीच आज हे कॉलेज मोठया दिमाखात व डौलात उभे आहे. आजपर्यंत १९ प्राचार्य कॉलेजला लाभले. मी या कॉलेजची २० वी प्राचार्य आहे. प्रत्येक प्राचार्यांचे कॉलेजच्या विकासात महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. जिजामाता कॉलेजला उभारण्यात त्यांनी यथाशक्ती प्रयत्न केले आहेत.त्यामुळे विदयमान प्राचार्य म्हणून मी त्यांची अत्यंत ऋूणी आहे.

जिजामाता कॉलेज केवळ भौतिक सुविधांनीच सुसज्ज आहे, असे नव्हे तर गुणात्‍मक पातळीवर देखील उर्ध्वगामी विकास करणारे आहे. स्त्रीला स्वावलंबी बनविणे हा हेतू समोर ठेवून शिक्षण देणारे हे कॉलेज आज आदर्श ‍‍शिक्षिका व स्वयंनिर्भर महिला निर्माण करत आहे. शैक्षणिक क्षेञात एक उपक्रमशील कॉलेज म्हणून जिजामाता कॉलेजचा लौकिक आहे. कॉलेजच्या अनेक विदयार्थीनी स्पर्धा परीक्षा पास होवून मोठमोठया पदांवर कार्यरत आहेत. क्रीडाक्षेञ, सांस्‍कृतिक क्षेञ या सर्वांमध्येच जिजामाता कॉलेजच्या विदयार्थीनी आपला लौकिक संपादन करताना पहावयास मिळतात.

कॉलेजचे दैनंदिन कामकाज सुलभ व गतिमान होण्यामध्ये लेखनिक व इतर सेवक वर्गाने आजपर्यंत फार मोठे काम केले आहे. या कॉलेजमध्ये मला उमेदीचे आणि समवयस्क सहकारी लाभले. हया सर्वांना विश्वासात घेवूनच मी कामकाजास सुरूवात केली आहे.

आज जिजामाता कॉलेजचे स्वतंत्र अस्तित्व उभे आहे. भविष्यातील सक्षम वाटचालीस तुमचे सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा आवश्यक आहेत, त्या तुम्ही दयालच. कॉलेजच्या प्रगतीचा आलेख आपणा सर्वांच्या सहकार्याने असाच उंचावत ठेवण्याचे अभिवचन मी तुम्हांस देते.

जय हिंद । जय कर्मवीर ॥

प्राचार्य,

सौ. कदम विश्रांती जयसिंग
जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा.